आज आपण काही विशेष रोगाची माहिती पाहणार आहोत, ज्यामध्ये तीव्र मेंदूदाह, चण्डिपुरा मेंदूरोग, हत्तीरोग, जपानी मेंदूज्वर आहेत.
Table of Contents
१)तीव्र मेंदूदाह-
तीव्र मेंदूदाह लक्षणे समूह (ए.ई.एस.) यामध्ये विविध आजारांच्या लक्षणाचा अंतर्भाव होतो. त्यामध्ये प्रामुख्याने जपानीज मेंदूज्वर, चंडीपूरा, मेंदूज्वर, इत्यादी आजार आहेत. वैद्यकियदृष्टया विषाणू, जीवाणू, बुरशी, परजीवी जंतू स्पायरोसिस काही रसायनी तत्वे इत्यादी घटकांमुळे मज्जा संस्थेवर होणा-या परिणामांच्या आजारांच्या लक्षणांचा समूह आहे. ऋतुमानाप्रमाणे व भौगोलिक क्षेञानुसार वाहक घटकांच्या परिणामामध्ये भिन्नता असते.काही विषाणूजन्य मेंदूदाहमध्ये आजाराची तीव्रता व मृत्यूचे प्रमाण अतिशय जास्त असू शकते. विशेषतः जपानीज मेंदूदाह व एन्टेरोव्हॉयरस मेंदूदाह यामध्ये भारताच्या काही भागात मृत्यूचे प्रमाण अधिक आहे.
आजाराची ठळक वैशिष्ट्ये-
हा रोग केंद्रीय मज्जा संस्थेवर परिणाम करतो. मृत्यूचे प्रमाण या रोगात फार जास्त आहे. जे रुग्ण वाचतात त्या रुग्णांमध्ये मज्जसंस्थ्ेावर दुष्परिणाम होतात. लहान मुलांमध्ये नैसर्गिकरित्या रोग प्रतिकारक शक्ती कमी असल्यामुळे या रोगाची बाधा लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणात आहे. रुग्णाचे अपंगत्व, मृत्यू इत्यादी कमी करण्याकरीता चांगले वैद्यकिय व्यवस्थापन आवश्यक आहे आजाराची तीव्रता व होणारे परिणाम हे विशिष्ट विषाणू, रुग्णांची प्रतिकारशक्ती व वातावरणातील विविध घटक इत्यादीवर अवलंबून आहे.
वातावरणातील घटक-
जपानीज मेंदूज्वर उद्रेक प्रामुख्याने मान्सून दरम्यान किंवा मान्सून नंतरच्या काळात उद्भवतात. या वेळी डासांची घनता वाढलेली असते परंतू इतर विषाणूमुळे झालेले मेंदूदाह जसे ऍन्टेरोव्हॉयरसेस मेंदूदाह हे जलजन्य असल्यामुळे त्यापासून होणारे मेंदूदाह वर्षभर आढळून येतात.
प्रसाराची पध्दत-
आजाराचा प्रसार हा विषाणूच्या प्रकारावर अवलंबून आहे.
अधिशयन काळ-
अधिशयन कालावधी हा वेगवेगळया आजारामध्ये वेगवेगळा आहे.
रोगाची लक्षणे व चिन्हे-
ए.ई.एस आजार समूहामध्ये तापाची तीव्रता कमी अधिक प्रमाणात असते. रुग्णामध्ये मज्जारज्जूशी संबधित लक्षणे आढळतात.
डोकेदुखी,
ताप,
बेशुध्द अवस्था
संभ्रम अवस्था,
अचेतन अवस्था,
हातापायाचा थरकाप,
संपूर्ण शरीर लुळे पडणे.
शारिरीक हालचालींमध्ये ताळमेळ नसणे इत्यादी
निदान-
या आजाराचे निदान खालील प्रयोगशाळा चाचण्याव्दारे करण्यात येते. पी.सी.आर व्दारे विषाणूंच्या आर.एन.ए.चे
परिक्षण-
आय.जी.एम. एन्टीबॉडीची चाचणी.
विषाणूचे अलगीकरण
उपचार-
या आजारांवर निश्चित असा कोणताही उपचार नाही परंतु रुग्णाच्या लक्षणांनुसार वेळेत केलेला उपचार मोलाचा ठरतो. आजारातून ब-या झालेल्या पण अपंगत्व आलेल्या रुग्णाचे पुनर्वसन हा उपचाराचा महत्वाचा भाग आहे.
प्रतिबंधात्मक उपाययोजना-
आजाराच्या प्रकारानुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येतात.
जे.ई., मेंदूज्वरामध्ये डास नियंञण करणे.
चंडीपुरा, मेंदूज्वरामध्ये – सॅन्डफलाय नियंञण करणे.
आरोग्य शिक्षण संदेश
परिसर स्वच्छता ठेवणे, वैयक्तिक सुरक्षा करणे, मच्छरदाणीचा वापर करणे. किटक प्रतिरोधक साधनांचा वापर इत्यादी.
२)चंडीपूरा मेंदूज्वर-
किटकजन्य रोग,साथरोग घटक
हा आजार प्रामुख्याने ग्रामीण भागात आढळतो.
भारतातील महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, छत्तीसगड या राज्याातील बहुतांश जिल्हेयात हा आजार आढळतो. महाराष्ट्रा, आंध्रप्रदेश व छत्तीयसगडला लागून असलेल्या
रुग्ण तुरळक स्वरुपात व विखुरलेले असतात.
हा आजार ० ते १४ वर्ष वयोगटातील बालकांमध्ये आढळतो.
रोगकारक घटक-
चंडीपूरा हा नवीन विषाणू असून नागपूर परिसरातील चंदीपूर या भागात रुग्णांच्या रक्तजलनमूने सर्वेक्षणात आढळून आला त्यावरुन त्याचे नाव चंडीपूरा ठेवण्यात आलेले आहे. चंडीपूरा आजाराच्या विषाणूचा प्रसार सॅन्डफलाय माशी चावल्यामुळे होतो.
सॅन्डफलाय ही माशी डासापेक्षा लहान असून तिचा रंग वाळूसारखा भुरकट असतो. माशीचे पंख केसाळ असतात. माशीचा आकार १.५ ते २.५ मिलीमिटर असतो. भारतातामध्ये सॅन्डफलायच्या एकूण ३० प्रजाती आढळून येतात. सॅन्डफलाय या माश्या राञीच्या वेळी जास्त क्रियाशील असतात व त्यांचा चावा अत्यंत वेदनादायक असतो. त्या क्वचितच दृष्टीपथास पडतात.
दिवसा सॅन्डफलाय माश्या घरातील अंधा-या जागा, भिंतीमधील भेगा व खड्डे यामध्ये राहतात. सॅन्डफलाय राञी क्रियाशील होऊन घरातील व्यक्तीचा चावा घेतात. मादी माशीला दर ३ किंवा ४ दिवसांनी अंडी घालण्याकरीता रक्ताची आवश्यकता असते.
हा आजार कोणाला होतो-
हा आजार १४ वर्षाखालील मुलांमध्ये विशेष करुन आढळून येतो.
पर्यावरणीय घटक-
हा आजार मुख्यतः ग्रामीण व आदिवासी भागात आढळतो. सदयस्थितीस शहरी भागातील झोपडपट्टीमध्ये देखील रुग्णांचे प्रमाण आढळून येत आहे.
रोगप्रसाराचे माध्यम-
हा आजार दुषित सॅन्डफलाय मादी माशीच्या चावल्यामुळे होतो. फक्त मादी सॅन्डफलाय माशीला अंडीच्या पोषणाकरीता रक्ताची आवश्यकता असते त्यामुळे तिने चावा घेतल्याने विषाणूचा प्रसार होतो.
अधिशयन काळ-
या आजाराचा अधिशयन काळ काही तास ते २ – ३ दिवस असतो.
लक्षणे-
या आजारामध्ये रोगाची लक्षणे अचानक सुरु होतात.
तीव्र डोकेदुखी, उलटी, झटके येणे, अर्धबेशुध्दावस्था अशी लक्षणे आढळतात.
रोगाचे निदान-
या आजाराची प्रयोगशालेय तपासणी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था पुणे तसेच काही निवडक सेंटीनल हॉस्पीटलमध्येही केली जाते.
औषधोपचार-
या आजारावर निश्चित असा उपचार नाही.परंतु रुग्णाच्या लक्षणानुसार वेळेत केलेला उपचार मोलाचा ठरतो.
प्रतिबंधात्मक आणि नियंत्रणात्मक उपाययोजनाः
या आजाराची सॅन्डफलाय माशी ही वाहक आहे व ती उत्पत्ती स्थानापासून फार दूर जाऊ शकत नाही त्यामुळे त्यांचे नियंञण करणे सोपे आहे. सॅन्डफलाय माशीचे नियंञण खालीलप्रमाणे करता येते.
किटकनाशके–
किटकनाशकाची फवारणी घरामध्ये, गोठयामध्ये व इतर अंधार असलेल्या जागेवर करावे.
परिसर स्वच्छता–
राहत्या घराच्या पन्नास यार्ड परिसरातील झाडे झुडपे खड्डे व कच-याची स्वच्छता करावी. घरातील भिंतीच्या भेगा बुजविणे तसेच पाळीव प्राण्यांचा गोठा व कोंबडयांची खुराडे राहत्या घरापासून दूर ठेवावी.
शेणखताचे ढिगारे गावापासून दूर ठेवावे.
आरोग्य शिक्षण संदेश
घराचा परिसर स्वच्छ ठेवा, घराच्या भिंतीच्या भेगा बुजवा.
पाळीव जनावरांचे गोठे,कोंबड्याचे खुराडे यांची स्वच्छता बाळगा.
३) हत्तीरोग-
रोगाचा प्रकार-
किटकजन्य रोग
नैसर्गिक इतिहास-
माणसांमध्ये लसिकाग्रंथिंच्या हत्तीरोगाचा प्रादुर्भाव गत ४००० वर्षापासून होत असावा,असे दिसून येते. सन १८६६ मध्ये लेविस, डिमार्क्यू आणि विचेरिया यांनी मायक्रोफायलेरिया व हत्तीरोगाचा परस्पर संबध असल्याचे स्पष्ट केले. सन १८७६ मध्ये जोसेफ बॅनक्रॉप्टी यांनी हत्तीरोगाचा पूर्ण वाढ झालेला जंतू शोधला. हत्तीरोग जंतूच्या जीवन चक्रासंदर्भात पॅटेट्रीक मॅन्सन आणि जॉर्ज कॉर्मिसेल यांचे संशोधन ही मोलाचे आहे.
रोगकारक घटक-
हत्तीरोगाचा प्रसार सुतासारखा दिसणा-या परोपजीवी कृमींमुळे होतो. भारतामध्ये ९८ टकके रुग्णांमध्ये हत्तीरोगाचा प्रसार बुचेरिया बॅनक्रॉप्टी या परोपजीवी कृमींमुळे झालेला आढळून येतो. भारतातील २५० जिल्हयांमध्ये स्थानिक स्वरुपात लागण झालेल्या हत्तीरोग रुग्णांची नोंद आहे.
प्रौढ अवस्थेमध्ये हत्तीरोगाचे जंतू लसीका संस्थेच्या वाहिन्यांमध्ये राहतात.लसीका संस्था ही लसीका ग्रंथी आणि लसीका वाहिन्यांची बनलेली यंत्रणा असून ती शरीरातील रोगप्रतिकार शक्ती अबाधित ठेवण्याचे कार्य करते.
रोगकारक घटक-
मनुष्यांमध्ये फार पुर्वीपासून हत्तीरोगाचे जंतू आढळून येतात.
वय – सर्व वयोगटांमध्ये हत्तीरोगाची लागण होऊ शकते.
लिंग – स्त्री किंवा पुरुष दोघांना हत्तीरोग होऊ शकतो. मात्र हत्तीरोगाचा प्रादुर्भाव असणा-या क्षेत्रात पुरुषांमध्ये हत्तीरोगाचे प्रमाण जास्त दिसून येते.
स्थलांतरीत लोकसंख्या – काम व इतर कारणांमुळे वारंवार स्थलांतर करणा-या लोकांमुळे एका भागातून दुस-या भागात हत्तीरोगाचा प्रसार होतो.
रोगप्रतिकार शक्ती – हत्तीचरोगाच्या रोगप्रतिकार शक्तीबाबत अदयाप निश्चित माहिती उपलब्ध नाही.
सामाजिक कारणे – वाढते शहरीकरण, औदयोगिकीकरण, लोकांचे एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी होणारे स्थलांतर,अज्ञान , गरीबी आणि अस्वच्छता
पर्यावरणीय घटक
वातावरण- २२ ते ३८ डिग्री सेंटीग्रेड तापमान आणि ७० टक्के आर्द्रता ही क्युलेक्स डासांच्या वाढीसाठी पोषक असते.
क्युलेक्सख डासांची उत्पात्तीत घाण, प्रदुषित पाण्याोत खूप मोठया प्रमाणात होते. अयोग्यण पध्दोतीची गटारे, शहरांचे व गावांचे अयोग्य आणि अपुर्ण नियोजन, सांडपाण्याचा अयोग्यं पध्दरतीने होणारा निचरा या सर्व बाबींमुळे क्यु्लेक्सप डासांची उत्पपत्तीा खूप मोठया प्रमाणात होते आणि त्यागमुळे हत्तीवरोगाचा प्रसार व प्रादुर्भाव वाढतो.
रोगप्रसाराचे माध्यम-
दुषित डास चावल्यामुळे हत्तीरोगाचा प्रसार होतो. (क्युलेक्स प्रकारचे डास बुचेरेरिया बॅनक्रॉप्टीया हत्तीरोगाच्या परोपजीवी जंतूचा प्रसार करतात.) दुषित डास मनुष्याला चावा घेतेवेळी त्या ठिकाणी हत्तीरोगाचे जंतू सोडतो. हा जंतू त्या ठिकाणाहून किंवा अन्य ठिकाणाहून त्वचेतून शरीरात प्रवेश मिळवितो आणि लसीका संस्थेमध्ये जातो.
अधिशयन काळ
हत्तीरोगाच्या संसर्गजन्य जंतूच्या शरीरातील प्रवेश आणि मायक्रोफायलेरिया रक्तात सापडणे. या कालावधी विषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही तथापि, हत्तीरोगाच्या संसर्गक्षम जंतूचा शरीरातील प्रवेश आणि आजाराची लक्षणे दिसण्याचा कालावधी हा ८ ते १६ महिन्यांचा असतो.
लक्षणे व चिन्हे-
रोग लक्षणाच्या ४ अवस्था असतात.
जंतू शिरकावाची अवस्था- यामध्ये आजाराबाबत लक्षणे दिसू शकतात.
लक्षणविरहीत अवस्था / वाहक अवस्था – यामध्ये रुग्णांचा रात्रीच्या रक्तनमूना तपासणीत मायक्रो फायलेरिया (mf) आढळून येतात मात्र रुग्णांमध्ये रोगाची कोणतीही लक्षणे व चिन्हे आढळून येत नाहीत.
तीव्र लक्षण अवस्था- या अवस्थेमध्ये ताप, लसीकाग्रंथीचा दाह, लसीकाग्रंथीना सूज तसेच पुरुषांमध्ये वृषणदाह इ. लक्षणे दिसून येतात.
दिर्घकालीन संसर्ग अवस्था- या अवस्थेमध्ये हात, पाय व बाहय जननेंद्रियावर सूज, अंडवृध्दी इ. लक्षणे दिसतात.
निदान-
हतीरोग जंतूच्या विशिष्ट सवयीमुळे हे जंतू मानवी रक्तात रात्री मोठ्या प्रमाणात आढळतात त्यामुळे रात्री ८.३० ते १२ दरम्यान रक्तनमूना घेऊन तपासणी केल्यानंतर हत्तीरोगाचे निदान करता येते.
औषधोपचार-
ज्या रुग्णांमध्ये मायक्रो फायलेरिया आढळून येतात. अशा रुग्णांना डीईसी (डायइथील कारबामाझाईन) या गोळया ६ मिलिग्रॅम प्रतिकिलो शरीराचे वजन (प्रौढ व्यक्ती ३०० मिलीग्रॅम ) या प्रमाणात १२ दिवस देण्यात येतात.
रुग्णांने पायाची स्वच्छता करणे आणि काळजी घेणे तसेच शारीरिक व्यायाम करणे हे महत्वाचे असते (विकृती व्यवस्थापन )
हत्तीरोगाची तीव्र लक्षणांसाठी वैद्यकीय सल्ल्याने योग्य उपचार घेणे आवश्यक असते.
प्रतिबंधात्मक आणि नियंत्रणात्मक उपाययोजना-
हत्तीरोग नियंत्रणात प्रतिबंधात्मक उपाययोजना महत्वाच्या आहेत.
अ )डासांचे नियंत्रण
डासांचे अळी अवस्थेत नियंत्रण करण्यासाठी – किरकोळ अभियांत्रिकी उपाययोजनाव्दारे डास उत्पत्ती स्थाने कमी करणे महत्वाचे आहे. मैला, घाण, कचरा इत्यादीची योग्य पध्दतीने विल्हेवाट लावणे. खड्डे, सखल जागा मातीचा भराव टाकून बुजविणे. साचलेल्या पाण्यातील पाणवनस्पती,गवत इत्यादी काढून टाकणे, डास उत्पत्ती स्थानांमध्ये मलेरिया ऑईल, पॅरीसग्रीन अथवा किटकनाशकाची फवारणी करणे,
डासांचे प्रौढ अवस्थेत नियंत्रण करण्यासाठी–
किटकनाशकांची फवारणी करणे. डासांच्या चावण्यापासून रोगक्षम व्यक्तिचे संरक्षण करणे.
आरोग्य शिक्षण- जनतेमध्ये पुढील मुददयाबाबत जागृती होणे महत्वाचे आहे.
मैला, घाण, कचरा इत्यादीची योग्य पध्दतीने विल्हेवाट लावणे.
सांडपाण्याचा योग्य पध्दतीने निचरा करणे.
मच्छरदाण्यांचा वापर करणे, घराच्या दारे, खिडक्यांना डास प्रतिबंधक जाळी बसविणे.
हत्तीरोगासाठी रात्रकालीन रक्तनमूना संकलनासाठी सहकार्य करणे.
ब ) रोगाचे सर्वेक्षण
क)एक दिवसीय सामुदायिक औषधोपचार हत्तीरोगाचा प्रसार रोखण्यासाठी हत्तीरोग समस्याग्रस्त लोकसंख्येमध्ये २ वर्षाखालील मुले,गर्भवती स्ञिया व गंभीर आजारी रुग्णांना वगळून सर्वाना वर्षातून एकदा एकाच वेळी डीईसी गोळया खाऊ घालणे महत्वाचे आहे. ही मोहिम किमान पाच वर्षे राबविल्यास हत्तीरोगाचे दुरीकरण होण्यास हातभार लागू शकतो.
आरोग्य शिक्षण संदेश-
लसीकाग्रंथीच्या हत्तीरोगासाठी वैयक्तिक स्वच्छता आणि हत्तीपायाच्या सूजेवरील उपचार.
हत्तीपाय असणा-या रुग्णांनी तीव्र लक्षण अवस्था टाळण्यासाठी पायांची किंवा बाधित अवयवांची साबण व पाण्याने नियमित स्वच्छता ठेवावी. पायाच्या आकारमानाप्रमाणे योग्य पादञाणे वापरावीत. पायाला जखम होऊ नये म्हणून काळजी घ्यावी. हत्तीरोगामुळे आलेल्या अंडवृध्दीसाठी शस्ञक्रिया करुन घ्यावी.
एक दिवसीय सामुदायिक औषधोपचार मोहिम व राञकालीन रक्तनमूना तपासणीत सहभाग घ्यावा. रक्तनमूना तपासून घेऊन उपचार घ्यावा.
डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी डास उत्पत्ती स्थानांच्या ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात.
गाचा संसर्ग रोखण्यासाठी आणि डासांचे जीवनचक्र ख्ंडीत करण्यासाठी साचलेल्या पाण्यात गप्पीमासे सोडावेत. पाण्याच्या टाक्या, रांजण, बॅरल, हौद यांना व्यवस्थित झाकणे बसवावीत. कापडाने झाकावीत, वेळोवेळी त्यांची स्वच्छता करावी. आठवडयातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा.
४)जपानी मेंदूज्वर-
सामाजिक दृष्टया गरीब वर्गामध्ये मे पासून हिवाळयापर्यंतच्या कालावधीत हा रोग प्रामुख्याने आढळतो. या रोगाचा प्रादुर्भाव लहान मुलांमध्ये विशेष करुन आढळतो. हा आजार स्ञी पुरुष दोघांमध्येही आढळून येतो तरीही पुरुषांमध्ये यांचे प्रमाण जास्त आढळते. जपानी मेंदूज्वराचे रुग्ण विखुरलेला स्वरुपात आढळतात.
नेमका हा कोठे आढळून येतो-
जपानी मेंदूज्वराच्या घटना प्रामुख्याने ग्रामीण भागातील गरीब लोकांमध्ये विशेषतः डुकरे पाळण्याचा व्यवसाय करणा-या लोकांमध्ये दिसून येतात. पक्षी किंवा डुकराव्यतिरिक्त गायी, म्हशी आणि वटवाघुळामध्ये सुध्दा या रोगाच्या अॅन्टीबॉडीज आढळून येतात.
कशामुळे होतो-
जपानी मेंदूज्वर हा विषाणूजन्य आजार आहे तो क्युलेक्स विष्णोई जातीच्या डासामुळे पसरतो.
या रोगाचा जीवनमान-
हा प्रामुख्याने प्राण्यांचा आजार असून याचा प्रादुर्भाव कधी कधी माणसांना होतो. या आजाराच्या विषाणूंचे निसर्गातील व्यवस्थापन प्रामुख्याने डुकरे, पक्षी यांमध्ये होते. प्रामुख्याने गाई-गुरांच्या भोवती चरणारे पक्षी (बगळे)किंवा तळयाभोवती वावरणारे पक्षी यांच्या शरीरात हा विषाणू वाढताना दिसतो.
या रोगाच्या जैवचक्रात डुकरे व पाणपक्षी हे विषाणूंचे यजमान ( Vriaemia Host ) म्हणून काम करतात. या नैसर्गिक यजमानांमध्ये विषाणू वाढत असला तरी त्यांच्यात रोगाची लक्षणे दिसत नाहीत. या प्राण्यांना चावणा-या प्रामुख्याने क्युलेक्स जातीच्या डासांपासून या रोगाचा प्रसार होतो.
प्रसार कसा होतो-
पावसाळा पूर्व व पावसाळी अशा डासोत्पत्तीस पोषक वातावरणात या रोगाचा प्रसार होताना दिसतो.
हा रोग वाढण्याचे प्रमाण-
जपानी मेंदूज्वराचा विषाणू माणसाव्यतिरिक्त प्रामुख्याने प्राणी व पक्ष्यांमध्ये आढळतो.
या विषाणूच्या प्रसाराचे प्राथमिक चक्र
अ) डुक्कर — डास — डुक्कर
आ) पक्षी –– डास — पक्षी
या प्रमाणे आहे. या रोगाचा प्रसार माणसामध्ये विषाणू दुषित डासांच्या चावण्याने होतो.
हा रोग वाढण्याचा काळ-
या विषाणूचा माणसांमधील अधिशयन काळ ५ ते १५ दिवसांचा आहे. डासांची मादी ” विषाणू दूषित “प्राण्याला चावल्यामुळे दुषित होते. नंतर या दुषित मादीपासून ९ ते १२ दिवस पर्यंत या विषाणूंचा प्रसार मानवासह इतर प्राण्यांमध्ये होऊ शकतो.
या रोगाची लक्षणे व चिन्हे कशी दिसून येतात-
सुरुवातीच्या आठवडयात हुडहुडी भरुन ताप, डोकेदुखी व अंगदुखी ही लक्षणे दिसतात. रुग्ण बेशुध्द अवस्थेत जाऊ शकतो. या रोगामुळे प्रामुख्याने लहान मुलांचे मृत्यू जास्त होतात. या आजारामध्ये काही रुग्णांमध्ये मळमळ, डोकेदुखी, ताप, उलटया व कधीकधी वृषणावर सूजही दिसून येते. या रोगामुळे मज्जासंस्थेचे विकार, भावनिक परिणाम व अपंगत्व इत्यादी परिणाम होऊ शकतात.
या रोगाचे निदान कसे करावे-
या रोगाचे निदान प्रामुख्याने रुग्णांच्या रक्तजलातील अॅन्टीबॉडीज शोधून किंवा ELISA पध्दतीव्दारे तसेच पाठीच्या मणक्यातील पाण्याच्या तपासणी (CSF) व्दारे करण्यात येते.
औषधोपचार कोणता करावा-
जपानी मेंदूज्वरावर कोणताही विशिष्ट असा उपचार नाही. रुग्णास हालवताना खालील काळजी घेणे आवश्यक आहे –
रुग्णास एका कडेवरच झोपवून ठेवावे.
रुग्णाच्या तोंडाची पोकळी व नाक स्वच्छ ठेवा. चिकटया ओढून घेण्याच्या यंञाचा उपयोग करावा. रुग्णास मान वाकवू देऊ नये. ताप जास्त असल्यास रुग्णांचे शरीर ओल्या फडक्याने पुसून काढावे. मोठे आवाज व प्रखर प्रकाश टाळावा.
या रोगाच्या नियंत्रणासाठी उपाय-
डासोत्पत्ती स्ञोत कमी करणे – डुकरांना गावाच्या बाहेर सोडणे. मेंदूज्वराच्या रुग्णांची व्यवस्थित नोंद ठेवणे.
डासांच्या घनतेवर नियंञण ठेवून विषाणूंचा प्रसार रोखणे.
तातडीची वैदयकिय मदत.
डासनियंञण व रुग्णाचे पुनर्वसन यासाठी लोकसहभाग-
जपानी मेंदूज्वराच्या नियंञणाचे उपाय
किटकशास्ञीय अभ्यास करणे.
लागण झालेल्या गावात धूरफवारणी करणे.
लोकांचे आरोग्य विषयक प्रशिक्षण, स्वच्छतेचे महत्व समजावणे, तसेच डुकरांच्या संख्येवर नियंञण करणे. नैसर्गिक डासोत्पादन स्थाने शोधण्यासाठी सर्वेक्षण करुन त्यातील योग्य जागी डासअळी नियंञणासाठी गप्पीमासे सोडणे.
आपण हे करु शकता-
रुग्णांची नोंदणी करणे, रुग्ण मोठया रुग्णालयात हालवण्यासाठी वाहतूक व्यवस्था करणे.
घरांमधील फवारणी, डास अळीप्रतिबंधक उपाययोजना खड्डे बुजवून पाण्याचे साठे कमी करणे, डुकरांच्या संख्येवर नियंञण् करणे, वेळोवेळी भातशेती मधील पाण्याचा निचरा करणे.
वैयक्तिक संरक्षणासाठी मच्छरदाणीचा वापर करणे, डास प्रतिबंधक विविध साधनांचा वापर करणे. डुकरांची निवासस्थाने वस्तीमध्ये न ठेवणे. आपापल्या गावांमध्ये मेंदूज्वराचा रुग्ण आढळल्यास ताबडतोब आरोग्य कर्मचा-यांना किंवा गावच्या सरपंचांना सूचित करणे. इत्यादी काळजी घेणे महत्वाचे आहे.